दु:खाची परिसीमा

आज परत खूप दिवसांनी ब्लॉग ला भेट देत आहे. खरं तर लिहिण्यासारखे बरंच काही होते. पण मध्यंतरी अशी काही घटना घडली की त्यातून सावरणे अशक्य झाले आहे. माझी खूप जवळची मैत्रीण, माझी खरी सोबतीण, माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असलेली माझी सखी  अचानक हे जग सोडून गेली. ९ फेब्रुवारी २०१८ हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. समर्थ रामदास स्वामींंच्या भक्त असलेल्या  माझ्या ह्या  जिवलग मैत्रिणीने दासनवमीच्या दिवशीच ह्या  जगाचा निरोप घेतला. मी मात्र अगदी हताश होऊन तिची मृत्यूशी चाललेली झुंज बघत होते. ही घटना मनाला हादरून टाकणारी तर होतीच पण म्रुत्यु आला की आपण किती हतबल होतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी होती. तिचे असे संसार अर्धवट सोडून जाणे अनेक प्रश्न निर्माण करून गेले.वास्तविक माझी ही मैत्रीण,मोहिनी म्हणजे अत्यंत साधं सरळ, निरागस, प्रेमळ आणि भाबडं व्यक्तिमत्त्व. प्राथमिक शाळेपासून तर महाविद्यालयीन शिक्षण आणि आजपर्यंतचा आमच्या मैत्रीचा प्रवास अविस्मरणीय असा आहे. लहानपणी आम्ही एकत्र खेळलो, बागडलो. आमची कट्टी देखील मजेदार असायची. कट्टी असताना देखील ती मला शाळेसाठी बोलवायला यायची. फक्त पूर्ण रस्ताभर आम्ही एकही शब्द बोलायचो नाही. असे फारतर दोन दिवस चालायचे मग दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून मनोसक्त रडायचो आणि आमची बट्टी व्हायची. आमच्या मैत्रीच्या आड कधीच आमची आर्थिक, कौटुंबिक किंवा सामाजिक परिस्थिती आली नाही. आमच्यात  कधीही वाद अथवा भांडण झालेले नाही. अर्थात ह्या गोष्टीचे संपूर्ण श्रेय मोहिनीलाच आहे. कारण तिला कधीच कोणाशीही अबोला धरणे जमलेच नाही. अशी आमच्या अनोख्या मैत्रीने लग्नानंतर ही आम्हाला एकत्र ठेवले होते. कारण मी पुण्यात आल्यावर वर्षांत ती पण आली आणि ते ही माझ्या घराजवळ. मग काय पुण्यातील कोपरा न कोपरा आम्ही तिच्या दुचाकीवर पालथा घातला. गाडीवर तर गप्पांच्या ओघात खुपदा आम्ही भलतीकडेच निघून जायचो. तसेच लिफ्टमध्ये जायचे आणि बटण चालू करायला विसरून जायचो. अशा ह्या निखळ मैत्रीच्या आड तिचे आजारपण आले आणि ती मला कायमची सोडून गेली. ती माझ्या सोबत नाही हे मला अजूनही पचनी पडत नाहीये.आता असे वाटते की ह्याहून वाईट आयुष्यात काय घडू शकते? आई वडील, बहिण, एकुलता एक मुलगा आणि आपल्या जीवापलिकडे जपलेल्या मैत्रीला अर्धवट सोडून जाताना तिच्या आत्म्याला ही खुप क्लेश झाले असतील. पण तिच्या म्रुत्युच्या आड तिची पुण्याई तिच्या आई वडिलांची पुण्याई, तिच्या मुलाचे अगाध प्रेम हे काहीच  का येऊ नाही? आमची सर्वांची प्रार्थना, श्रध्दा व्यर्थ ठरवत तिला ह्या जगाचा निरोप घ्यावा लागला. उत्साही असणाऱ्या ह्या मुलीला अशा रितीने हे जग सोडून जावे लागणे हे मनाला अजूनही पटतच नाहिये. मान्य आहे की जीवन मरण आपल्या हातात नसते. पण म्हणतात ना की चांगले कर्म केले तर शेवट चांगला होतो. मग तिच्या सर्व इच्छा अपूर्ण ठेवून तिचा अंत त्रासदायक का व्हावा हे मला अजूनही उमगत नाही. कारण मेंदूतील गाठींंमुळे ती बेशुद्ध झाली. शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. शेवटी डॉक्टरांनी क्रुत्रीम श्वास थांबवायचा निर्णय घ्यायला लावला. वाटले आता संपले सर्व. पण बेशुद्ध अवस्थेतच ती धाप लागल्या प्रमाणे जोरात श्वास घेऊ लागली. तिचा श्वास थांबण्याऐवजी जोरजोरात सुरू झाला. परत आशा निर्माण झाली. पण डॉक्टरांनी सांगितले की असे होते आणि श्वास थांबतो. पण आम्हाला तिची ही अवस्था बघवत नव्हती. शेवटी तिच्या कोणाकोणात जीव अडकला असेल ती प्रत्येक व्यक्ती तिच्या जवळ जाउन बोलून येते होती. अगदी तिचे ऐंशी ओलांडलेले तिच्या आधारावर जगणारे तिचे आईवडील ही आम्ही आमची काळजी घेऊ असे सांगून आले. शिवाय श्रीराम, गणपती, गजानन महाराज, श्री श्री रविशंकर अशी सर्वांची आराधना करून झाली.पण तिचा श्वास थांबत नव्हता. खरं तर तिच्या खुप इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या. तिला आई बाबांंना फिरवण्यासाठी कार चालवायची होती, संगीत विशारदची शेवटची परीक्षा द्यायची होती, तिच्या लाडक्या लेकाला खुप मोठं झालेलं बघायचं होते आणि आम्ही दोघी मिळून आर्ट ऑफ लिव्हिंग चे शिक्षक होणार होतो. पण नियती आम्हाला तिचा श्वास कधी थांबतोय ह्याची वाट बघायला लावत होती. आईबाबांचा आक्रोश, तिच्या मुलाच्या जीवाची तगमग पाहून पराकोटीचे दुःख काय असते ते अनुभवलं. तिचा त्या जोरात चालणाऱ्या श्वासाने सर्वांना आशा होती की काही तरी चमत्कार घडेल. पण चमत्कार ही घडत नव्हता आणि श्वास ही थांबत नव्हता. ती सगळ्यांंना हवी होती, तरीही तिच्या जाण्याची वाट बघण्याची दूर्देवी वेळ आमच्यावर आली होती. शेवटी  तिच्या जीवाच्या तुकड्यानेच ह्रदयावर दगड ठेवून तिला सांगितले,” आई, मी स्वतः ची काळजी घेईन, तू शांतपणे जा.” हे ऐकले आणि त्या माऊलीने डोळे उघडून आपल्या लेकाकडे पाहिले आणि अखेरीस तिचा श्वास  थांबला. तिचे शिल्लक असलेले श्वास संपायला तब्बल अठरा तास लागले. दुःखाची परिसीमा गाठणारा हा प्रसंग माझ्या ह्रदयावर खोलवर रुतून बसला आहे. तिच्या बाबतीत असे का घडावे ह्याचे उत्तर मला अजूनही मिळत नाहीये. तिच्यासारख्या परोपकारी, आनंदी, कष्टाळू आणि समाधानी व्यक्तीचे असे जाणे मन स्वीकारतच नाहीये.त्यामुळे काही लिहावे, नवीन काही करावे असे वाटतच नाही.आज तिच्या विषयी लिहून मन हलकं करण्याचा प्रयत्न.

सौ. मंजुषा देशपांडे, पुणे.

Manjusha Deshpande

I am certified and trained family counselor with post graduate degree in psychology ( M.A.) from Pune University. I have done specialization in Matrimonial Counseling and also REBT Therapist. 'Simplify Life' is my Counseling center under which services like Psychological testing and career guidance, child & adolescent counselling, Marital-premarital counselling, Geriatric Counselling, Stress- Anger- Fear Management are included. I am also certified life skill trainer. I take workshops on study skills, Sex Education, Anti addiction, Abuse, HIV-AIDS etc. I am founder member of non-profitable and non government organization (NGO) LEAF ( Life Empowerment & Awareness Foundation ). Through this we help economically backward children, women and families. My hobbies are writing, reading and music.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *