नातं ‘ती’चे आणि भाजीवालीचे

ती जेमतेम दीड वर्षाची चांगल्या सुखवस्तू घरातली मुलगी. तिचं घर भर भाजीबाजारात होते.  सोसायटीमध्ये तसे तिच्या बरोबरीचे कोणीच नव्हते. त्यामुळे तिचा मित्रपरिवार म्हणजे घराखाली दुकान मांडणारे भाजीवाले. त्यातील एक आजी आणि त्यांच्या मुलाशी तर तिची विशेष दोस्ती होती. रोज सकाळी अगदी लवकर उठून आवरून तयार व्हायचे आणि आपल्या दोस्तांची वाट पाहत बसायचे एवढेच तिचे रुटीन होते. आपल्या आजी आणि मामा दिसले रे दिसले की लगेच टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करणार आणि सुसाट त्यांच्याकडे धावत सुटणार. मग तिच्या त्या आजी नऊवारीच्या कमळातून कुठलेसे काजळ काढणार आणि भसाभसा तिच्या डोळ्यांत घालणार. शिवाय कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाची एक मोठी तिट (तिट कसली मोठा गोळाच असायचा) कपाळाच्या कोपऱ्यात लावणार. ती पठठी पण घरी अजिबात कधी काजळ घालू द्यायची नाही पण त्या आजींकडून मात्र मुकाट्याने सर्व करून घ्यायची. नंतर समोर झालर असलेली वैशिष्टपूर्ण टोपी डोक्यावर चढवून पोरगी भाजी विकायला तयार. 

“चला कोथींबीर एकेक रुपय्या…कोथिंबीर एक रुपय्या” असे ओरडत ती भाजी विकण्याचा मनोसक्त आनंद लुटायची. मग त्यांच्या सोबतच इटुकल्या दातांनी भाकरीचा तुकडा चघळत बसायची.जेवायला देखील घरी जायला तयार नसायची. शेवटी तिची आई तिचा वरणभात त्या भाजीवाल्या आजींजवळ द्यायची तेव्हाच तिचे जेवण होत असे. नंतर तो मामा तिला गाईंच्या, बकऱ्यांच्या पाठीवरून संपूर्ण मंडईची सफर घडवून आणत असे. रम्य ते बालपण ह्याचा पुर्णपणे अनुभव ती घेत होती.

पण ह्याचा त्रास तिच्या आईला खूप सहन करावा लागला. कारण उच्चभ्रू समाजाच्या दृष्टीने हे चित्र खूप भयानक होते. लोकांचे नावं ठेवणे, समजावणे, बोल सुनावणे, ह्या सर्व गोष्टींनी ती माउली वैतागून जायची. पण लेकीला मिळणारा निखळ आनंद, निर्व्याज्य प्रेम आणि लेकीचे सुख ह्या पुढे तिने समाजाच्या बोचऱ्या नजरा आणि कुटुंबातील विरोध ह्याकडे दुर्लक्षच केले. आईला फक्त काळजी एकच होती की लेकीचे आरोग्य तर बिघडणार नाही ना? कारण प्रत्येकजण अनारोग्यपूर्ण अशा गोष्टींबद्दल तिच्या आईला सल्ला देत होता. पण आईचे अंतरमन सांगायचे की काही होणार नाही लेकीला; उलट मोकळेपणाने वाढू दिले तर प्रतिकारशक्ती चांगली होईल. आणि गंमत म्हणजे एकदाही तिची लेक आजारी पडली नाही. त्यामुळे एका आईने आपल्या लेकीसाठी आपली उच्चभ्रूपणाची शाल आपल्या अंगावरून तर काढलीच पण आपल्या लेकीला देखील पांघरू दिली नाही. म्हणूनच तिच्या लेकीचे आणि त्या भाजीवाल्या आजींचे एक वेगळेच वायापलीकडचे मैत्रीचे नातं निर्माण होऊ शकले. आणि आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे अश्या वातावरणातच तिचे बालपण खरोखरच सुखाचे झाले.

मंजुषा देशपांडे-

Manjusha Deshpande

I am certified and trained family counselor with post graduate degree in psychology ( M.A.) from Pune University. I have done specialization in Matrimonial Counseling and also REBT Therapist. 'Simplify Life' is my Counseling center under which services like Psychological testing and career guidance, child & adolescent counselling, Marital-premarital counselling, Geriatric Counselling, Stress- Anger- Fear Management are included. I am also certified life skill trainer. I take workshops on study skills, Sex Education, Anti addiction, Abuse, HIV-AIDS etc. I am founder member of non-profitable and non government organization (NGO) LEAF ( Life Empowerment & Awareness Foundation ). Through this we help economically backward children, women and families. My hobbies are writing, reading and music.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *